Spread the love

ऑस्ट्रावा / महान कार्य वृत्तसेवा

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा आपला शानदार फॉर्म दाखवला आणि गोल्डन स्पाइक मीट 2025 चा किताब जिंकला आहे. पॅरिस डायमंड लीग जिंकल्यानंतर अवघ्या चार दिवसांत, नीरजनं 24 जून रोजी ऑस्ट्रावा इथं झालेल्या या स्पर्धेत 85.29 मीटरचा सर्वोत्तम थ्रो मारुन एक नवीन टप्पा गाठला. ही स्पर्धा जागतिक ॲथलेटिक्स उपखंडीय टूरची सुवर्णपदक पातळीची स्पर्धा होती ज्यामध्ये 9 खेळाडूंनी भाग घेतला होता. नीरजनं पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला आणि थेट विजेतेपद पटकावलं.

2025 च्या हंगामातही उत्तम कामगिरी सुरुच : गेल्या दोन हंगामात, नीरज तंदुरुस्तीच्या कारणांमुळं या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. विशेष म्हणजे त्याचे प्रशिक्षक जान झेलेंजी यांनी या स्पर्धेत आतापर्यंत 9 विजेतेपदं जिंकली आहेत आणि आता नीरजनंही त्याच यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. 27 वर्षीय नीरज चोप्रानं या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे.

दोहा, पॅरिसमध्येही मिळवला होता विजय : मे महिन्यात, नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये 90 मीटर अंतर पार करुन दुसरं स्थान पटकावलं. यानंतर, पॅरिस डायमंड लीग आणि आता गोल्डन स्पाइक मीटचं विजेतेपद जिंकून, नीरजनं दाखवून दिलं आहे की पॅरिस ऑलिंपिक 2024 नंतरही तो त्याच्या लयीत आहे आणि सतत नवीन उंचीकडे वाटचाल करत आहे.

बंगळुरुमध्ये दिसणार नीरज चोप्रा : चोप्रानं यापूर्वी ऑस्ट्रावामध्ये भाग घेतला आहे, पण गोल्डन स्पाइकमध्ये नाही. तो 2018 मध्ये आयएएएफ कॉन्टिनेंटल कपमध्ये सहभागी झालेल्या आशिया पॅसिफिक संघाचा भाग होता आणि 80.24 मीटरच्या फेऱ्यासह सहावं स्थान पटकावलं. 16 मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये आणि 23 मे रोजी पोलंडमध्ये झालेल्या जानूझ कुसोझिंस्की मेमोरियल मीटमध्ये वेबरनं चोप्राला हरवलं होतं. परंतु 20 जून रोजी पॅरिसमध्ये 88.16 मीटरच्या पहिल्या फेरीच्या थ्रोनं या भारतीय खेळाडूनं त्याला मागे टाकलं. पॅरिसपूर्वी, चोप्रानं जून 2023 मध्ये लॉसनं इथं 87.66 मीटरच्या थ्रोसह शेवटचं डायमंड लीग विजेतेपद जिंकलं होतं. चोप्राची पुढची स्पर्धा आता एनसी क्लासिक असेल जी तो 5 जुलै रोजी बेंगळुरुमध्ये आयोजित करत आहे. पीटर्स आणि रोहलर देखील बेंगळुरुमध्ये स्पर्धा करतील.