नाशिक / महान कार्य वृत्तसेवा
कौटुंबिक वादातील नैराश्यातून नाशिक इथल्या पोलीस जवानानं सहा वर्षीय मुलीचा खून करुन गळफास घेत आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. ही घटना नाशिकरोड भागात घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासोबतच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्निल गायकवाड असं आत्महत्या केलेल्या पोलीस जवानाचं नाव आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर स्वप्निल गायकवाड हा मुलीचा सांभाळ करत होता.
पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानं नैराश्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई स्वप्निल गायकवाड हा उपनगर पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षापासून नेमणुकीला होता. मात्र मागील काही दिवसांपासून स्वप्निल हा आजारी होता. वर्षभरापूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर मुलीचा स्वत: सांभाळ करत होता. तो मॉडेल कॉलनीतील मंगल प्रभात सोसायटीत वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होता. राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या योगमाला इमारतीत चौथ्या मजल्यावर स्वप्निल याचा स्वत:चा फ्लॅट आहे. स्वप्निल मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुलगी भैरवीला घेऊन त्या फ्लॅटवर गेला. मात्र सायंकाळी सहा वाजता भैरवीचा क्लास असल्यानं ती आली नाही, म्हणून स्वप्नीलची आई हिराबाई त्या फ्लॅटवर नातीला बघण्यासाठी गेल्या. त्यानंतर स्वप्निल दरवाजा उघडत नसल्यानं आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीनं दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडल्यानंतर मध्ये बाप-लेक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. स्वप्निलनं सात वर्षाच्या भैरवीला नायलॉनच्या दोरीनं अगोदर गळफास दिला. यानंतर त्याच दोरीनं स्वत:ही गळफास घेतला, असं पोलिसांनी सागितलं.
भैरवीचं शाळेत जाण्याचं स्वप्न अर्धवट : पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर स्वप्निल यानं मुलीचा संभाळ स्वत: करण्याची तयारी दर्शवली होती. यामुळे मुलगी भैरवी ही त्याच्याकडंच राहत होती. यावर्षी जेलरोडच्या अभिनव शाळेत पहिलीच्या वर्गात तिचा प्रवेश करण्यात आला. मात्र भैरवीचं शाळेत जाण्याचं स्वप्न अर्थवटच राहिल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आठ महिन्यापूर्वी झाला होता अपघात : स्वप्निलचे वडील दीपक गायकवाड हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. स्वप्नील हा 2014 साली पोलीस दलात भरती झाला होता. पोलीस शिपाई म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षापासून त्याची नेमणूक होती. आठ महिन्यापूर्वी त्याचा दुचाकी अपघात झाल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली. स्वप्निलच्या औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागला. त्यावेळी उपनगर पोलिसांनी आर्थिक मदत उभी केली होती.
