जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांची पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
मेंदुला रक्तस्त्राव झाला असताना वैद्यकीय क्षमता नसतानाही गुडघ्यावर उपचार करुन रूग्णाच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून इचलकरंजी येथील आर्थेापेडीक डॉक्टर अमित देशमुख आणि सौरभ कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना दिले आहेत. या संदर्भातील तक्रार कबनूर येथील रूग्णाची पत्नी अमृता कोले यांनी केली होती.
या संदर्भात अधिक माहिती अशी, कबनूर येथील अमर आदिनाथ कोले याचा 9 एप्रिल रोजी पंचगंगा कारखान्याजवळ अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी इचलकरंजीतील संभाजी चौक येथे ऑर्थेापेडीक सर्जन डॉ. अमित देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कोले याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. देशुमख यांनी कोले याच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले त्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले. यानंतर देशमुख यांनी हे प्रकरण इचलकरंजी गोसावी गल्ली परिसरातील डॉ. सौरभ कुलकर्णी यांच्याकडे ही केस सोपवली. येथे उपचार सुरू झाले. तरीही मेंदूतील रक्तस्त्राव थांबलेला नाही. नातेवाईकांनी तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला डिस्चार्ज द्या, आम्ही दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये रूग्णाला हलवतो, अशी विनंती केली. तरीही देशमुख यांनी डिस्चार्ज देण्यास टाळाटाळ केली. कदाचित, बील वाढविण्यासाठी आणि रूग्णांच्या नातेवाईकांचा खिसा रिकामा करण्यासाठी डॉ. देशमुख यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप त्यावेळी रूग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. अनेकवेळा विनंती करूनही डिस्चार्ज मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या रूग्णाच्या पत्नी अमृता कोले यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्याकडे पोर्टलवर तक्रार नोंदवली. याची तातडीने दखल घेत डॉ. देशमुख यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना खरमरीत पत्र लिहून डॉ. देशमुख आणि कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर डॉ. संगेवार यांनीही संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतू, या प्रक्रियेला 20 दिवस झाले तरीही अद्याप डॉ. संगेवार यांच्या नोटीसला उत्तर दिले नसल्याचे समजले.
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी कोणताही खुलासा केला नसल्याचे कळते. त्यामुळे या प्रकरणात नक्की काळंबेरं आहे, अशी माझी खात्री झाली आहे. प्रकरण दडपण्यासाठी अर्थपूर्ण घडामोडीही घडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
– अमृता कोले, रूग्णाची पत्नी
