मिरज / महान कार्य वृत्तसेवा
विधानसभा मतदारसंघ फेररचनेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ हा यापुढे राखीव राहणार नाही. त्यामुळे मिरजेचा पुढील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. मिरज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे, भाजपाचे ईश्वर जनवाडे यांच्या सहित अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची राज्यात महायुतीचे सरकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक नाही तर, जेथे युती होणे शक्य नाही. तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढती कराव्याच लागतील. राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागतील.
कोणत्याही स्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावू, अस सांगून, हसन मुश्रीफ पुढे, म्हणाले, मिरज आणि सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्यावत केली जातील. सर्व उपचार याठिकाणी केले जातील. त्यामुळं यापुढे कोणत्याही रुग्णांना उपचारासाठी मुंबई मध्ये जावे लागणार नाही.
शिवसेना उबाठा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, मिरज तालुका महिला संघटिका नीता आवटी, शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे, शहर संघटक किरण कांबळे, उपशहर संघटक जब्बार मुजावर, आकाश चव्हाण, युवा नेते डॉ.अमर कुरणे, शुभम साळुंखे, योगेश आवळे आणि भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य ईश्वर जनवाडे, मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जावेद मुल्ला आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी मध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात, माजी नगरसेविका स्वाती पारधी, महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, मिरज महिला शहराध्यक्ष शितल सोनवणे, आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
