पॅरिस / महान कार्य वृत्तसेवा
फ्रान्समधील फेटेस दे ला म्युझिक महोत्सवावेळी धक्कादायक घटना घडली. कार्यक्रम सुरू असताना ठिकठिकाणी गर्दीतील नागरिकांवर इंजेक्शन सिरिंजद्वारे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये एकूण 145 जण जखमी झाले. इंजेक्शन सिरिंजद्वारे झालेल्या हल्ल्यांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे.
हल्ल्यांसाठी वापरलेल्या इंजेक्शन सिरिंजमध्ये काय होते, हे अद्याप पोलिसांनी सांगितलेले नाही. इंजेक्शन सिरिंजद्वारे झालेल्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या 145 जणांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जखमींमध्ये महिला आणि तरुणींची संख्या मोठी आहे. प्राथमिक वृत्तानुसार जखमी झालेल्यांपैकी किमान तीन जणांची तब्येत खालावली आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांची तब्येत एकदम बिघडली. या जखमींवर उपचार सुरू आहेत.
जेवढे नागरिक जखमी झाले त्या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. पोलीस हल्लेखोरांची कसून चौकशी करत आहेत. हल्ल्यांमागील उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी कायदेशीर कारवाईसाठी ज्या ज्या ठिकाणी हल्ले त्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. या फूटेजची बारकाईने तपासणी सुरू आहे.
