Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी रात्री लंडन येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते.

डावखुरे फिरकी गोलंदाज दोशी यांचे निधन हृदयविकारामुळे झाले. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, दोशी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्येच राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नयन इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये सरे आणि महाराष्ट्राच्या सौराष्ट्र संघाकडून खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 898 बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी 238 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 43 वेळा 5 बळी घेतले. एका सामन्यात 6 वेळा 10 बळी घेण्याचा विक्रम केला होता.

भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त, दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्यांनी सौराष्ट्र आणि बंगाल संघाकडूनही क्रिकेट खेळले. याशिवाय, परदेशी कौंटी क्रिकेटमध्ये दोशी यांनी वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. अलीकडेच बीसीसीआयने एका समारंभात दोशी यांचा सन्मानही केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही ते उपस्थित होते. दोशी यांनी वयाच्या 32 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिलीप दोशी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नव्हती. त्यांनी 1980 च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. दोशी यांनी आपल्या ‘स्पिन पंच’ या आत्मचरित्रात आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सविस्तर लिहिले आहे.

दोशी यांच्या निधनावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोशी यांच्या फोटोसह सोशल मिडीयात त्यांच्या निधनाची बातमी शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासोबतच सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील दोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. तसेच फिरकीपटू अनिल कुंबळे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत दोशी यांच्या कारकिर्दीचे स्मरण करत श्रद्धांजली दिली आहे.