Spread the love

गर्दी टाळण्यासाठी शहरात आवश्यक रस्त्यांची निर्मिती होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला महत्त्वपूर्ण निर्णय

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा

नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. यासाठीची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. कुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी होते. अशा स्थितीत आवश्यक रस्त्यांची निर्मिती करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. यासाठी डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक रविवारी (22 जून) नागपुरात पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक – नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात नागपूर येथील हैद्राबाद हाऊस इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. यावेळी कुंभमेळ्याच्या नियोजनावर चर्चा झाली. तसेच, कुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी होते. यासाठी शहरात पर्यायी आणि आवश्यक रस्ते बांधण्यास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून तत्वता: परवानगी मिळाली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार स्मिता वाघ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदार आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली तत्वत: मान्यता- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थापन, नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरण रक्षण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. नाशिकला जोडणारे जवळपास महत्त्वाचे 8 मार्ग आहेत. यामध्ये मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर,संभाजीनगर, धुळे या मार्गानं भाविक नाशकात दाखल होतात. हे सर्व मार्ग कुंभच्या काळामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्याअंतर्गत रस्तेदेखील राष्ट्रीय महामार्गास जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वत: मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

वाहतूक नियोजनासाठी रिंगरोडला मान्यता – ”कुंभमेळाच्या काळात ट्रॅफिकची मोठी समस्या येणार आहे. याचा विचार करूनच विस्तारित रस्त्यांचे जाळे यातून निर्माण होणार आहे. यामुळे भक्तांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर नाशिक ते त्र्यंबक 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रामुख्यानं द्वारका सर्कल येथील सुविधा भक्कम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कळंबोली जंक्शनच्या धरतीवर द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यात करण्याचा निर्णय झाला. यात कुंभपर्यंत होणारे काम व कुंभनंतर हाती घ्यावयाचे काम असे दोन टप्पे ठरवण्यात आले.

या मार्गांचा होणार विकास –

1) घोटी – पाहिने – त्रिंबकेश्वर – जव्हार फाटा

2) द्वारका सर्कल – सिन्नर आयसी 21 (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार

3) नाशिक ते कसारा

4) सावली विहीर (आय सी 20 समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)

5) नाशिक ते धुळे

6) त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर

7) सावली विहीर – मनमाड – मालेगाव

8) घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी

9) शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)