Spread the love

तातडीने दुरुस्ती करावी ,अन्यथा आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा

गावभाग परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देवून सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

गावभाग परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे मोडकळीस आले आहेत.याशिवाय या शौचालयांची नियमित स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरुन त्याची दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे.याबाबत रविवारी सकाळी नागरिकांनी विशेषतः महिलांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी पियूष लालबेग यांना बोलावून घेतले.तसेच कर्मचाऱ्यांच्या नियमित शौचालय स्वच्छतेच्या
कामचुकारपणामुळे नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले.यावेळी त्या अधिका-यांनी याबाबतची विचारणा संबंधित कर्मचाऱ्यांकडे केली असता त्याने उलट उद्धटपणे उत्तर दिले.त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिका-यांचे ऐकत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना कोण न्याय देणार,असा सवाल निर्माण झाला आहे.. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे यांनी सदर शौचालयाच्या दरवाजाची दुरुस्ती करुन नियमित स्वच्छता करावी ,अन्यथा या विरोधात नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.त्यामुळे अधिका-यांनी नागरिकांचा संताप लक्षात घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करुन शौचालयांची चांगली सुविधा उपलब्ध करुन देऊ ,असे आश्वासन दिले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.