नागपूर / महान कार्य वृत्तसेवा
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात रविवारी वादग्रस्त विधान करत वातावरण तापवले. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमधील मुख्यमंत्री सचिवालयातील हैदराबाद हाऊसमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांनी आझमींच्या विधानाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
वारीवरून अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे. अशा विधानांमुळेच त्यांना प्रसिद्धी मिळते, असं त्यांना वाटतं. पण मला त्यांची विधानं इतकी महत्त्वाची वाटत नाहीत की त्यावर उत्तर द्यावं. त्यामुळे त्यांच्या फालतू विधानाकडे दुर्लक्ष करतो.”
काय म्हणाले होते अबू आझमी?
अबू आझमी यांनी नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केली, ज्यात ते म्हंटले की, ”आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले होते.
