Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात एक जोडीदार असावा या भावनेतून एका 85 वर्षांच्या आजोबांनी लग्नासाठी प्रयत्न केला. त्यांनी आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात केली. पण त्यांना भावी पत्नीचा आयुष्यभरासाठी हाथ मिळवण्याऐवजी थेट फसवणुकीच्या प्रकाराला सामोरे जावे लागले. पुण्यात ही घटना घडली.

लग्नाच्या इच्छेने एका 85 वर्षीय वृद्धाने ज्या स्वप्नांना उराशी बाळगले, त्याच स्वप्नांचा चक्क वापर करून त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून समोर आलेल्या या अजब आणि धक्कादायक फसवणुकीच्या घटनेने सध्या शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेल्या वृद्ध नागरिकाने एका स्थानिक दैनिकात छापलेल्या विवाहविषयक जाहिरातीतून संपर्क साधला. जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करताच समोरून ‘आकांक्षा पाटील’ नावाची व्यक्ती बोलत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वृद्धाकडून ‘रजिस्ट्रेशन फी’, ‘डॉक्युमेंट प्रक्रिया’, ‘वधू कुटुंबाशी संपर्क’ अशा विविध कारणांनी एकूण 11 लाख 45 हजार 350 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले गेले.

या आरोपी महिलांनी वृद्धाला ‘ममता जोशी’ नावाची वधू असल्याचे सांगून तिचा मोबाईल नंबरही दिला. त्यामुळे फसवणूक योजनाबद्ध आणि विश्वासार्ह वाटावी यासाठी सर्व पद्धती अवलंबण्यात आल्या होत्या. पण काही दिवसातच आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हतबल झालेल्या या वृद्ध व्यक्तीने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार मांडला.

या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीवरून तीन अज्ञात महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, ऑनलाइन व्यवहारांद्वारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून अशा प्रकारे वरिष्ठ नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटना वाढत चालल्या असून, अशा व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येते. लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ही विविध प्रकारची फसवणूक सुरू असते. त्यामुळे अशा वेळी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात येते.