लीड्स / महान कार्य वृत्तसेवा
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं अद्भुत कामगिरी दाखवली. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियानं प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 471 धावा केल्या. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शानदार शतकी खेळी केली. या तीन खेळाडूंव्यतिरिक्त, सध्या ज्याची सर्वात जास्त चर्चा होत आहे तो म्हणजे करुण नायर.
3006 दिवसांनी फलंदाजीची संधी : विशेष म्हणजे करुण नायरला 3006 दिवसांनंतर टीम इंडियासाठी टेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, पण त्याचा डाव फक्त 4 चेंडू आणि 13 मिनिटांत संपला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर ऑली पोपनं करुण नायरचा एक शानदार झेल घेतला. यापूर्वी, करुण नायरनं 25 मार्च 2017 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता. परंतु खातंही न उघडता बाद झाल्यामुळं त्याचं पुनरागमन अपयशी ठरलं.
पुनरागमनासाठी करुण नायरची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट : एके काळी करुण नायरनं टीम इंडियात पुनरागमनासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. कारण टीम इंडियामधून वगळल्यानंतर करुण नायर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चमकदार कामगिरी करत होता, परंतु तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. म्हणूनच करुण नायरनं त्याच्या पुनरागमनासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.
त्रिशतक झळकावणारा दुसरा भारतीय : गेल्या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी दाखवल्यानंतर, करुण नायरच्या पुनरागमनाबद्दल सर्व बाजूंनी चर्चा सुरु होती. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांना त्याची संघात निवड करावी लागली. करुण नायरनं 2017 साली इंग्लंडविरुद्ध शानदार खेळ करुन त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. यासह कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो वीरेंद्र सेहवागनंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला, परंतु त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. अशाप्रकारे, त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी 8 वर्षे लागली.
