Spread the love

बीरभूम (कोलकात्ता) / महान कार्य वृत्तसेवा

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात बेकायदेशीरपणं बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील लाभपूर पोलिस ठाण्यातील हटिया गावात घडली आहे.

पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटाच्या घटनेला राजकीय वळण लागलं आहे. भाजपाचे बीरभूमचे संघटनात्मक जिल्हा अध्यक्ष ध्रुव साहा म्हणाले, बनावट सोन्याच्या नाण्यांवरून तृणमूलच्या दोन गटांमध्ये वाद झाला आहे. या वादात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेची एनआयएनं चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली. शेख साबीर (26) आणि शेख आलमगीर (18) अशी मृतांची नावे आहे. बीरभूम जिल्हा पोलिस अधीक्षक अमनदीप सिंह यांनी स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मात्र, स्थानिकांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा जास्त असू शकतो. मृतामध्ये एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे.

घटनास्थळी मोठ्या संख्येनं पोलीस दल तैनात- बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तणावाची स्थिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी मोठ्या संख्येनं पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचा पोलिसांनी दावा केला. बीरभूममधील लाभपूर येथील हटिया गाव बनावट सोन्याची नाणी विकण्याचं केंद्र म्हणून ओळखले जाते. लोकांना फोन करून आणि त्यांची दिशाभूल करून बनावट सोन्याची नाणी विक्री होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात पोलिसांना अनेक तक्रारीदेखील देण्यात आल्या आहेत. लोकांची फसवणूक टाळण्यासाठी बीरभूम पोलिसांनी जाहिराती करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

टोळीच्या दोन गटांमध्ये वाद- शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर, दोन्ही टोळीतील गुंडांनी गावातील रस्ते आणि शेतांवर अनेक बॉम्बस्फोट केले. यात सत्ताधारी पक्षाचे लोकही सहभागी असल्याचा आरोप आहे. हटिया गावातील तृणमूल बूथ अध्यक्ष शेख नैमुद्दीन आणि त्यांचा सहकारी शेख मुस्तफिर यांच्या गटात झाल्याचा स्थानिकांकडून आरोप करण्यात येत आहे.

गावात पोहोचले पोलिसांचे पथक- स्थानिक सूत्रांनुसार, आज पहाटे मोनीर यांचा गट गावातील छतीम तलावाच्या काठावर बसू बॉम्ब बनवत हेती. त्याच वेळी अचानक स्फोट झाला. या अपघातात अनेक लोकांचे मृतदेह घटनास्थळी विखुरलेले होते. तथापि, आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणखी चार जण गंभीर जखमी असल्याचं बोललं जात आहे. जखमींना उपचारासाठी बोलपूर उपविभागीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती होती. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत पोलीस गावात प्रवेश करू शकले नाहीत. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे पथक गावात पोहोचले आहेत.

दोन गटामध्ये वर्चस्वासाठी वाद-ग्रामस्थ शेख नजरुल इस्लाम म्हणाले, मार्च 2024 मध्ये हटिया गावात बनावट सोन्याच्या नाण्यांच्या टोळीतील गुंडांनी पोलिसांच्या वाहनाची तोडफफोड केली होती. त्यादरम्यान, परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. यावेळी बनावट सोन्याच्या नाण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीतील गुंड बॉम्बस्फोटात गुंतले आहेत. ग्रामस्थांच्या माहितीनुसार टोळीतील दोन गटामध्ये वर्चस्वासाठी वाद सुरू आहे.