मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ चांगल्या स्थितीत वाटत होता. जसप्रीत बुमराहच्या जबरदस्त सुरुवातीनं इंग्लंडला दबावात आणलं होतं, पण मोहम्मद सिराजच्या एका निर्णयामुळे भारताच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरल्याचं चित्र उभं राहिलं. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या आणि इंग्लंडला कठीण लक्ष्य दिलं. बुमराहने पहिल्याच षटकात झॅक क्राऊलीला बाद करत चाहत्यांना सेलिब्रेशनची संधी दिली. इंग्लंडने फक्त 4 धावांवर पहिला विकेट गमावला आणि भारताच्या चाहत्यांना वाटलं की, आता इंग्लंड बॅकफफूटवर जाईल. पण दुसऱ्याच षटकात शुभमन गिलने बॉल दिला मोहम्मद सिराजला आणि इथेच सगळा खेळ बदलला.
मोहम्मद सिराज ठरला व्हिलन
सिराजने त्याच्या षटकात दोन चौकार दिले. त्यानंतर पुन्हा एकदा बुमराहने अचूक बॉल टाकून इंग्लंडवर दबाव टाकला. पण जेव्हा सिराज पुन्हा चौथ्या षटकात गोलंदाजीला आला, तेव्हा पुन्हा दोन चौकार झेलावे लागले. सिराजच्या स्वैर माऱ्यामुळे बुमराहच्या आक्रमक माऱ्यावरचा प्रभावही कमी झाला. गिलने त्यानंतर लगेचच सिराजची ओव्हर थांबवली, पण तोवर इंग्लंडचे फलंदाज आत्मविश्वासाने खेळू लागले होते. इंग्लंडवरचं सुरुवातीचं दडपण हळूहळू हटत गेलं आणि त्यांनी आक्रमक शैलीने फलंदाजी करत धावांचा वेग वाढवला.
जिथं बुमराह इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकत होता, तिथं सिराजने त्यांना फटकेबाजीची मोकळीक दिली. यामुळे केवळ इंग्लंडची रनगती वाढली. मोहम्मद सिराजने आक्रमक गोलंदाजीचा प्रयत्न केला खरा, पण त्यात अचूकतेचा अभाव होता. परिणामी, इंग्लंडने दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारत सामना पुन्हा बरोबरीत आणला. जर सिराजने त्या क्षणी अचूक मारा केला असता, तर कदाचित भारताची पकड दुसऱ्या दिवशी मजबूत राहिली असती.
