इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागांमधील जवळपास १०० शाळांना १०० अधिकारी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत केले. त्याचबरोबर दाखला वाटप प्रक्रिया सुलभ करणे आणि नवीन अभ्यासक्रमाचा प्रारंभ निर्विघ्नपणे सुनिश्चित करण्याकरिता महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती लक्षणीय रित्या वाढवण्यासाठी तसेच समग्र शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून शाळा प्रवेशोत्सव” हा अत्यंत उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे यांचेसह महानगरपालिका विभाग प्रमुख तसेच अधिकारी शहरातील सर्व शाळांना भेटी दिल्या.
आजच्या शाळा प्रवेशोत्सोव सोहळ्यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत प्रत्येक शाळेमध्ये विविध पद्धतीने करण्यात आले. आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महानगर पालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा आणि राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य वाटप सुरू करणेत आले.
नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी सक्रिय संवाद साधुन शाळा व्यवस्थापनाशी विचार विनिमय करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणेची ग्वाही दिली.
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये पहिल्याच दिवशी वृक्ष देऊन नवागतांचे पर्यावरणपूरक स्वागत. उपायुक्त अशोक कुंभार यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी पालकांना वृक्ष संवर्धनाचे आवाहन केले. प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची सजवलेल्या वाहनांमधून वाजत-गाजत शालेय परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक संजय भंडारे, मुख्याध्यापिका अलका शेलार, शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, बांधकाम विभागाचे आकाश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेटके आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.