इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
गुंतवणूकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून 43 लाख 43 हजार 206 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेया जैन या महिलेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी धनंजय केरबा ठिगळे (वय 40 रा. गुरुकन्नननगर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फेसबुक व टेेलिग्रामच्या माध्यमातून श्रेया जैन या महिलेने फिर्यादी धनंजय ठिगळे यांच्याशी संपर्क साधला. तिने सोशल मिडीयावरुन प्लस 500 या कंपनीची माहिती देत गुंतवणूकीचे पर्याय सुचवत जादा परताव्या मिळवून देण्याचे आमिष दाखवत एक लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. जैन हिच्या सांगण्यावरुन ठिगळे यांनी 31 मार्च 2025 ते 4 जून 2025 या कालावधीत कंपनीने पाठविलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात 42 लाख 43 हजार 206 रुपये भरले. परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा परतावा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे ठिगळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसात श्रेया जैन हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
