Spread the love

डॉ.केतकी साखरपे, सचिन बुरसे आणि अमरपाल कोहली यांचे नेत्रदीपक यश

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे ८ जून रोजी झालेल्या कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन इचलकरंजीतील डॉ.केतकी साखरपे, सचिन बुरसे आणि अमरपाल कोहली यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांचे आज शहरात आगमन होताच जल्लोषात मिरवणुक काढण्यात आली.

जगातील सर्वात आव्हानात्मक मानल्या जाणार्‍या पीटरमेरिट्झबर्ग ते डर्बन दरम्यानच्या डोंगराळ आणि अत्यंत खडतर अशा ९० किलोमीटर मार्गावर झालेल्या या स्पर्धेत जगभरातून २२ हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये इचलकरंजीतील डॉ.केतकी साखरपे, सचिन बुरसे आणि अमरपाल कोहली यांच्यासह भारतातील ४०० स्पर्धकांचा समावेश होता. या स्पर्धेत सचिन बुरसे यांनी प्रतिष्ठेचे बिल रोवन मेडल तर डॉ.केतकी साखरपे आणि अमरपाल कोहली यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. गेल्या २ वर्षांपासून या तिन्ही धावपटूंनी अविरत सराव करुन हे यश संपादन केले आहे. यातून जागतिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपले कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय सिद्ध केला आहे. त्यांची ही कामगिरी भविष्यात अनेक धावपटूंना निश्चितपणे प्रेरणा देणारी आहे.

स्पर्धेनंतर इचलकरंजीत आल्यावर या तिन्ही यशस्वी खेळाडुंचे भव्य मिरवणुकीने आणि सत्कार समारंभाने उत्साहात स्वागत करण्यात आले. या आनंदोत्सवात आय एम फिट क्लब, इचलकरंजी रनर्स, युएफसी क्लब, राजाराम वॉकर्स, ए. के. फिटनेस क्लब, रिंगण फिटनेस, ऍक्टिव्ह बॅडमिंटन ग्रुप, टीम भारत, टीम अर्जुन, एन.एफ.सी. क्लब, आर.बी.सी. क्लब, रोटरी क्लब सेंट्रल आणि स्वस्त मस्त रहे ग्रुप यांचा समावेश होता. यावेळी शहरातील डॉक्टर, वकील, अभियांत्रिकी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.