शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहर आणि परिसरातील शाळांमध्ये सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, टॉफी आणि फुगे देऊन स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी रांगोळी, ढोल-ताशांच्या गजरात फेटे बांधून आणि पुपेट शोच्या माध्यमातून नवीन वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत झाले.
आई-वडिलांसह पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांना आकर्षक सेल्फी पॉईंट आणि रंगीत सजावटीमुळे आनंदाचा अनुभव आला. काही शाळांमध्ये ‘वेलकम बॅक टू स्कूल’ अशा आकर्षक पोस्टर व फलक लावण्यात आले होते. शिक्षिका आणि शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांचे हसतमुखाने स्वागत केले. नवीन वर्ग, नवीन दप्तर, नवे पुस्तकं आणि नवीन मित्र-मैत्रिणींमध्ये हरवलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. नव्या शिक्षण वर्षाच्या पहिल्या दिवशीचा हा आनंद विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.
पहिल्याच दिवशी गणवेश शैक्षणिक साहित्य
सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांची शाळा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या पहिल्याच दिवशी ८०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त अशोक कुंभार, मुख्याध्यापक शंकर पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे साहित्य वितरण करण्यात आले.
