जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर येथील लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स स्कूल जवळ श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोरच्या बाजूला नव्या इमारतीत इलेक्ट्रिशनचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्याने वायर चोरताना सापडल्याने परिसरातील नागरिकांनी बेदम मारहाण करून संशयितास पोलिसांच्या स्वाधीन केलेची घटना घडली आहे. दरम्यान या संबंधित चोरट्याने जयसिंगपूर व परिसरातील अनेक ठिकाणच्या बांधकामावरील इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्याचे उघडकीस आल्याची चर्चा होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, इचलकरंजीतील सुमारे 35 वयोगटातील संशयित तरुणाने परिसरातील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन मालकांनी पाठवले, कॉन्टॅक्टर ने पाठवलंय, वायरिंग चेक करण्यासाठी आलो आहे, असे सांगून शिल्लक राहिलेले वायर तोडून स्वतः जवळील बॅगेमध्ये घालून चोरून नेत असल्याची चर्चा होती. याबाबत याच्या मागावर पोलीस असतानाच येथील स्वामी समर्थ मंदिरासमोरील बांधकामावर सदर चोरटा त्या ठिकाणी जाऊन वायरिंग तपासण्याच्या बहाण्याने बऱ्याच रूम मधील शिल्लक वायर कट करून बॅगेत भरत असताना काही कामगार व परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले.
याबाबत त्याला विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे संशयिताने दिल्याने. संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसेच त्याला जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला आरोग्य तपासणी करिता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असता. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मार बसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सदर घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबतची रात्री उशिरापर्यंत नोंद झाला नव्हता. दरम्यान 5 जून रोजी शिवाजी हाउसिंग सोसायटी येथील जिनगोंडा पाटील यांच्या बांधत असलेल्या इमारतीमध्येही असाच प्रकार घडला होता. यावेळीही पोलिसांनी चोरट्यांच्या वर कोणतीच कारवाई केली नसल्याचे समजते.
