इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरातील अण्णा रामगोंडा शाळेसमोरील भाजी मार्केटमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याने भाजी मार्केट मध्ये दुर्गंधी पसरली आहे. भाजी विक्रेत्यांसह आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. समोरच असणारी शाळा आजपासून सुरू झाल्याने परिसरातील दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कचरा उठाव करून या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
अण्णा रामगोंडा शाळेसमोरील भाजी मार्केट ही सुविधा व घाणीने नेहमीच त्रस्त असते दिवसभर या ठिकाणी बाजीविक्री केल्यानंतर शिल्लक राहिलेला भाजीपाला असाच रस्त्यावर उघडा टाकला जातो. त्यामुळे या ठिकाणी डुकरांचा वावर व भटक्या जनावरांचा वावर वाढला आहे. याचा उपद्रव या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांना होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सदरचा भाजीपाला हा कुजून त्या ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे. भाजी मंडईच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ सदरचा कचरा टाकला जात असल्याने या ठिकाणाहून चालत जाणे येणे ही मुश्किल झाले आहे.
भाजी मंडईच्या आतील बाजूची घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पसंती देत देत आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या रहदारीलाही अडथळे निर्माण झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने कचरा उठावाचे कोट्यावधी रुपयांचे टेंडर देऊनही कचरा वेळेत उठाव केला जात नाही. याबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दररोज कचरा उठाव न करणाऱ्या एनडीके कंपनीवर ही कारवाईचा बडगा महापालिका प्रशासनाने उगारणे गरजेचे बनले आहे. भाजी मार्केटच्या परिसरातच नागरी वस्तीत जास्त प्रमाणात असून समोर महापालिकेची प्राथमिक शाळा आहे. भाजीपाला व फळभाज्यांचा कचरा सडल्याने उघड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तातडीने या ठिकाणचा कचरा उठाव करून सदर जागेवर औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
