तब्बल 2 महिन्यानंतर शाळेत किलबिलाट सुरू
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
औक्षण, ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी, मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप, दिंडी तसेच शालेय पोषण आहारासोबत गोडधोड पदार्थांसह शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा व इंग्लिश मिडीयम जयसिंगपूर शहरातील शाळांची नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाची पहिली घंटा सोमवारी वाजली. पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळेत सुमारे 16 हजार 31 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर पहिलीच्या वर्गात सुमारे 4 हजार मुलांनी हजेरी लावली.
तब्बल 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शिरोळ तालुक्यातील शाळांनी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचा कार्यक्रम झाला. जयसिंगपूर शहरातील नगरपालिका आणि खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात सहभाग घेतला.
जयसिंगपूर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार, शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख मेघन देसाई आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नगरपालिकेच्या शाळा नं.4 मध्ये आदित्य पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शहरातील सामाजिक संघटनांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नगरपालिकेच्या शाळा नं.2 मध्ये जायंटस ग्रुप ऑफ स्वामिनी सहेलीच्या वतीने विद्यार्थ्यांना अंकलिपी, टोप्या व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी अध्यक्षा अॅड.सुचित्रा घोडके, फेडरेशन उपाध्यक्षा स्नेहल कुलकर्णी, साजिदा घोरी, रागिनी शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.
