कुरुंदवाड / महान कार्य वृत्तसेवा
कुरुंदवाड शहराच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी. यासाठी मी राज्य सरकारकडे तातडीने चर्चा करणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल. जनतेच्या हितासाठी ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास जावी. यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालून प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले हे कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर आले असता कुरुंदवाड येथे कालकथित गौतम ढाले यांच्या निवासस्थानी भेट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बांधकामची पाहणी आणि कुरुंदवाड शहराच्या रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी गेल्या 52 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला भेट असा नियोजित दौरा होता.
कालकथित गौतम ढाले यांच्यासारखे कणखर, जाज्वल्य विचारांचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते म्हणूनच मी आज देशभर समाजाचे नेतृत्व करू शकलो. त्यांच्या विचारांची आणि कार्यतत्परतेची प्रेरणा माझ्या हृदयात सदैव जागृत राहील, अशी भावना व्यक्त करत मंत्री आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली.
स्मारकाची पाहणी करून मंत्री आठवले म्हणाले “कुरुंदवाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा समाज बांधवांनी अनेक दशकांपूर्वी कष्टातून उभारला, ही अभिमानाची गोष्ट आहे. हे स्मारक शिरोळ तालुक्याच्या सामाजिक जागृतीचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक स्मारकाच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
पालिकेसमोर नळ पाणीपुरवठा योजनेत संदर्भात सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला मंत्री आठवले यांनी भेट दिली असता कृती समितीचे राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे, जितेंद्र साळुंखे यांनी मंत्री आठवले यांना पाणीपुरवठ्याचा लेखाजोखा सांगत आंदोलनाचा अहवाल दिला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तमराव कांबळे, मंगलराव माळगे, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, जयपाल कांबळे, सुरज शिंगे, धमपाल ढाले, शिशुपाल ढाले,खंडू भोरे, संदीप बिरणगे, राजेंद्र बेले, अर्षद बागवान, अनिकेत बेले, सुरेश स्वामी आदी उपस्थित होते.
