Spread the love

विजयनगर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

म्हैसाळ / महान कार्य वृत्तसेवा

मॉडेल स्कूल उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढला आहे. जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधांसोबत गुणवत्ताही उत्तम आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

 दीड महिन्याच्या सुट्टीनंतर चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी करण्यात आली. मिरज पूर्व भागातील विजयनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहिलीच्या वर्गात चिमुकल्या विद्याथ्यांचे उत्साहात स्वागत झाले, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजासाहेब लोंढे, म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी सरपंच राजकुमार कोरे यांनी जिल्हा परिषदेच्या विजयनगर शाळेत उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला.

फुलांच्या पायघड्या, पारंपरिक वाद्यांचा गजर, गोड खाऊ देत जल्लोषी वातावरणात प्रवेशोत्सव साजरा झाला. शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक देण्यात आली. आकर्षक रांगोळी, फुलांचे तोरण आणि फुगे लावून शाळा सजविल्या होत्या.

यावेळी सरपंच दिपाली कुल्लाळ, आशाताई आवळे, नंदकुमार कोरे, गजानन शिंदे, प्रियांका माळी, सारिका कोरे,  रजिया मुल्ला, स्वाती बनसोडे, कामेश कांबळे, ग्रामसेवीका जयश्री नागरगोजे यासह पालक, ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.