Spread the love

सातारा / महान कार्य वृत्तसेवा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरमध्ये 24 तासात तब्बल 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या 17.43 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. दमदार पावसामुळं सातारा जिल्ह्यातील रस्ते जलमय आणि शेतांची तळी झालीत.

कोयना धरणात पाण्याची आवक वाढली : गेल्या तीन-चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. धरणात प्रतिसेकंद 1,336 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या 17.43 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळं यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासली नाही. तसंच वीजनिर्मितीही पूर्ण क्षमतेनं झाली. नवीन तांत्रिक वर्ष (1 जून) सुरू होतानादेखील धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक होता.

कोयनानगरमध्ये उच्चांकी पावसाची नोंद : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा तसंच महाबळेश्वरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दमदार पावसामुळं धरणातील पाण्याची आवक वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगरमध्ये सर्वाधिक 104 मिलीमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे 80 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 70 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी जोरदार पाऊस बरसला. गेली काही पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीतदेखील वाढ होऊ लागली आहे.

रस्ते आणि शेतांची झाली तळी : पावसामुळं रस्ते आणि शेतांची तळी झाल्याचं पाहायला मिळतंय. शेतीच्या कामांवरदेखील पावसामुळे मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी मशागतीही पूर्ण झालेल्या नाहीत. काही ठिकाणी मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु तेथील पेरणी, टोकणीची कामे पावसामुळं खोळंबली आहेत. या दुहेरी चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम खडतर जाणार असल्याचं चित्र दिसत आहे.