राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी शिरलं
रत्नागिरी / महान कार्य वृत्तसेवा
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने राज्यभरात धडाक्यात पुनरागमन केले आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. खेड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे
खेडच्या मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. खेडमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे. जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आल्यामुळे रत्नागिरीतील दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे.
याशिवाय, संगमेश्वर तालुक्यात शास्त्री आणि सोनवी या दोन मोठ्या नद्यांना पूर आला आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्याकतील धामणी, संगमेश्वर इथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील श्रद्धा हॉटेलला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. शास्त्री आणि असावी नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने या परिसरात अनेक हॉटेल आणि लॉजमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले आहे.
