Spread the love

कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी अद्यापपर्यंत 51 जणांचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान, काही नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, काल मावळमध्ये पूल कोसळला पूल कोसलला आणि किमान 50 लोक वाहून गेले. माझा प्रश्न अजित पवारांना आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. अनेक वर्षांपासून आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकारही आहे. मी आणि पुणे जिल्हा कोणीही वेगळं करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची अजित दादा पवार पालकमंत्री म्हणून जबाबदारी आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात. तेथील आमदार सुनिल शेळके यांना अजित दादा घेऊन फिरतात. त्यांच्या निवडणूकीत मोठा खर्च त्यांनी केला. एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षांमध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामांमध्ये झोपलेले असतात आणि मोठ्या बिल्डरांचे काम, मेट्रोचे काम, मोठ्या ठेकेदारांची कामे यात पालकमंत्री जागे असतात, असा हल्लबोल त्यांनी यावेळी केला.

पालकमंत्री कुठे फिरत आहात?

संजय राऊत पुढे म्हणाले की, काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण हे अजित दादा पवार यांनी सांगायला पाहिजे. काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले आणि मेले. अजित पवार कालपासून काही बोलण्याचे मी पाहिले नाही. एरवी मोठ्या मोठ्याने आणि तावातावाने ते बोलत असतात. त्यांची जबाबदारी नाही का? पालकमंत्री कुठे फिरत आहात? तुम्ही काय करत आहात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे भष्टाचाराचे आणि बेफिकरीचे बळी

आमच्या राज्याच्या मुख्यमंत्रींनी चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. खरं म्हणजे तुमच्या चौकशीच्या आदेश दिले पाहिजे, मुख्यमंत्री काय करत आहेत? तुमची चौकशी केली पाहिजे. तुम्ही आल्यापासून राज्यात दुर्घटनांची मालिका सुरू आहे. भष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत. हे कालचे बळी भष्टाचाराचे आणि बेफिकरीचे बळी असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे

⁠कालच्या घटनेला अजित पवार जेवढे दोषी आहेत, तेवढेच त्यावेळचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. या संदर्भात यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे. अजित पवार नाकाने कांदे सोलत असतात. माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी घ्या आणि सांगा चूक झाली, असेही संजय राऊत म्हणाले.