अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी सात अल्पवयीन मुलांनी मिळून एका 42 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मृत व्यक्तीच्या मोबाईल फोनचा मोठा पुरावा ठरला. कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सखाहरी चत्तर हे 8 जूनपासून बेपत्ता होते. त्यानंतर नांदुर्खी बुद्रुक येथील एका उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. चौकशीत समोर आले की, मृताचा मोबाईल एका अल्पवयीन मुलाने साडेचार हजार रुपयांना विकला होता आणि त्याच पैशातून आरोपींनी वाढदिवसाची पार्टी केली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी गणेश चत्तर यांचे पायी जात असताना अपहरण करण्यात आले. नशेच्या अवस्थेत असलेल्या मुलांनी आधी त्यांना काठी व हातांनी मारहाण केली, नंतर गळा दाबून आणि धारदार चाकूने हल्ला करून हत्या केली. त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. याच मोबाईलच्या ट्रॅकिंगमुळे पोलिसांनी सातही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खळबळजनक असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी शिर्डीत झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करून लूट केल्याचा आणि एका तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि नंतर त्याचा खून करण्यात आल्याची ही घटना शिर्डीमध्ये घडली आहे. यासंदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे..
मोबाईलच्या लोकेशनमुळे प्रकार आला उघडकीस
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील 42 वर्षीय गणेश सखाहरी चत्तर हे 8 जूनपासून बेपत्ता होते. त्याच दरम्यान शिर्डी जवळील नांदुर्खी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल 13 जून रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मयत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला आणि त्यानंतर या खुनाला वाचा फुटली. गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना उसाच्या कांडक्याने तसेच हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला. हा मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला. पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी सात अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.
