इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा या शासन उपक्रमा अंतर्गत स्वच्छ आणि सुंदर झोपडपट्टी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये शहरातील सर्वच झोपडपट्टी सहभागी व्हाव्यात, याकरिता महानगर पालिकेकडून सदर झोपडपट्टी परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या झोपडपट्टीमध्ये पारितोषिक म्हणून झोपडपट्टी वासियांच्या मागणी नुसार आवश्यक विकास कामे करणेत येणार आहेत. असे आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले.
इचलकरंजी शहरांमध्ये स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा या शासन उपक्रमा अंतर्गत स्वच्छ व सुंदर झोपडपट्टी स्पर्धेच्या आयोजना करिता आयुक्त पल्लवी पाटील यांनी यांनी शनिवारी शहरातील विविध ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत लोकप्रतिनिधींनी स्वच्छ सुंदर झोपडपट्टी स्पर्धे संदर्भात सुचना केल्या. महापालिकेच्यावतीने यापुर्वी स्वच्छ, सुंदर आणि हरित आपली इचलकरंजी हा ध्यास नजरेसमोर ठेवून आयुक्त पल्लवी पाटील यांचेकडून शहर स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून स्वच्छतेच्या कामकाजाचे योग्य नियोजन, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वच्छता विषयक कामकाजावर देखरेख, विविध माध्यमांतून सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, घंटागाडीच्या कामकाजामध्ये सुसुत्रता, ओला -सुका कचरा विलिनीकरण, विविध माध्यमां द्वारे शहरवासीयांची स्वच्छतेबाबत जनजागृती, घंटागाडी मध्ये कचरा न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, इतरत्र कचरा टाकणाऱ्या नागरिकाचा फोटो काढून महानगरपालिकेच्या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठविणाऱ्या नागरिकास बक्षीस योजना अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
आता स्वच्छ व सुंदर झोपडपट्टी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठीच्या नियम आणि अटी महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागाकडे पहावयास मिळतील. तरी शहरातील सर्व झोपडपट्टी वासियांनी स्वच्छ आणि सुंदर झोपडपट्टी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे. सदर बैठकीला उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त नंदू परळकर, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, रवी रजपुते, भाऊसाहेब आवळे, सुहास जांभळे, महादेव गौड, किसन शिंदे, श्रीरंग खवरे, संजय केंगार यांचेसह आदी उपस्थित होते.
