Spread the love

नगर पथविक्रेता समितीच्या पहिल्या सभेत  झाला निर्णय

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी महानगरपालिका हद्दीमध्ये चहा- कॉफी साठी वापरण्यात येणाऱ्या कागदी व प्लास्टिक च्या कपमध्ये आतील बाजूस पातळ प्लास्टिक कोटिंग असल्यामुळे ते नागरिकांच्या शरीरास अपायकारक  आहे.  दि १ जुलै पासून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील चहा टपरी, हॉटेल मध्ये चहा कॉफी साठी प्लास्टिक व कागदी कप वापरावर बंदीचा निर्णय घेण्यात आला. इचलकरंजी नगर पथविक्रेता समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये सदरचा निर्णय घेण्यात आला.

इचलकरंजी शहर पथ विक्रेता समितीची पहिली सभा  आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. या सभेमध्ये स्थिर फेरीवाला झोन, फिरता फेरीवाला झोन, नो फेरीवाला झोन, मांसाहारी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन, सर्व पथ विक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आला. तसेच   डिजिटल  बोर्ड मुक्त शहरानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेणारी इचलकरंजी महानगर पालिका कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. बैठकीत  विषयपत्रिके वरील ९ व ऐन वेळचे २ अशा एकूण ११ विषयवर चर्चा झाली. शहरातील पथ विक्रेत्यासाठी स्थिर, फिरता व नो फेरीवाला झोन निश्चित करण्यात आले.
शहरातील अनेक पथ विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शक्य त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पथ विक्रेत्यांना पट्टे मारण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील सर्वच राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यापासून १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यवसायाला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील चिकन ६५, बिर्याणी, आम्लेट विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निश्चित करणेचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील सकाळी व संध्याकाळी व्यवसाय करणाऱ्या पथ विक्रेत्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली. पथ विक्रेते आपला व्यवसाय करताना गाड्याजवळ डस्टबीन ठेवणे, प्लास्टिकच्या कोणत्याही मायक्रोन च्या पिशव्या न वापरणे, गाड्याच्या मागील बाजूस असलेल्या गटारी स्वच्छ ठेवणे, फूड व ड्रग्ज विभागाचे प्रमाणपत्र सोबत ठेवेणे, हातगाडा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे व डस्टबीन मध्ये जमा झालेला कचरा हा इतरत्र न टाकता सर्व जमा झालेला कचरा घंटागाडी मध्येच टाकणे आदी नियमावली ठरविण्यात आली. या नियमाचे काटेकोरपणे पालन  करणार नाहीत, अशा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईसह लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या समिती सभे मध्ये आयुक्त तथा पथ विक्रेता समिती अध्यक्षा पल्लवी पाटील, उपायुक्त अशोक कुंभार, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, रेकॉर्ड कीपर सदानंद गोनूगडे, अनिकेत राजापुरे, पथ विक्रेता समिती सदस्य दिपक पाटील, कॉ.सदाशिव मलाबादे, अश्विनी कुबडगे, मनीष नायडू, राकेश माळी, लक्ष्मी कांबळे, श्रीमती वेणूताई पोवार, समीर सोलापुरे, वासिम बागवान, श्रीमती सुवर्णा कुसाळे, श्रीनिवास फुलपाटी, नितीन परिट आदी उपस्थित होते.