Spread the love

कोल्हापूर /महान कार्य वृत्तसेवा

सर्वसामान्य लोकांच्यासाठी आमचा लढा सुरू असतो. जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे कोणी गेले आले तरी काही फरक पडत नाही. अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापुर येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले तर आनंदच आहे असेही त्यांनी सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रत्येक पक्षाकडून पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. कोल्हापुरातील काँग्रेसचे काही नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सतेज पाटील म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी कोणाच्याही दबावाखाली व नियमांना फाटा देऊन प्रभाग रचना करू नये. निवडणुकीत जनता कोणालाही कौल देईल. तो मतदारांचा कौल असतो.मात्र प्रभाग रचनेत नियमांना सोडून काही होऊ नये. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे प्रभाग रचनेवर लक्ष ठेवून आहोत. अहमदाबाद येथील विमानाच्या अपघाताच्या चौकशी संदर्भात पत्रकाराने प्रश्न केला असता आमदार पाटील म्हणाले, विमान अपघात कसा घडला याची वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे. चौकशी करून सगळा प्रकार जनतेसमोर मांडला पाहिजे. आज विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विमानातून प्रवास करणाऱ्यांना आपण सुरक्षित आहोत याचा विश्वास सरकारने दिला पाहिजे. तसेच विमान अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला पाहिजे. विमान अपघातामुळे सारा देश हळहळत आहे. सरकारने लोकांना विश्वास दिला पाहिजे. पत्रकार परिषदेवेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, दुर्वास कदम आदी उपस्थित होते.