मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य पुरस्कार समारंभात, ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुळकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कारानं’ सन्मानित करण्यात आलंय. सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना. श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचं स्वरूप शाल, मानपत्र आणि ₹51,000- रोख रक्कम असं होतं. यावेळी बोलताना मंत्री श्री. शेलार म्हणालं की, ”महाराष्ट्राची नाट्यपरंपरा ही एक समृद्ध सांस्कृतिक ठेवा असून, ही परंपरा काळानुसार सर्जनशीलतेनं समृद्ध करत ठेवणं गरजेचं आहे. अशा उपक्रमांमुळे कलावंतांच्या कार्यास प्रेरणा मिळते आणि सांस्कृतिक परिघ अधिक व्यापक होतो.”
कार्यक्रमात ‘हे’ कलाकार झाले सहभागी : या सोहळ्यात नीना कुळकर्णी यांनी आपल्या भाषणात रंगभूमीवरील प्रवासाच्या आठवणी सांगत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी नाट्यगुरु सत्यदेव दुबे, विजया मेहता यांच्यासह अनेक मार्गदर्शकांचे आभार मानले. तर अभिनेते सुरेश साखवळकर यांनी लेखक पु.ल. देशपांडे आणि छोटा गंधर्व यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेबद्दल बोलताना सांगितलं की, हा पुरस्कार त्यांच्या रंगसेवेचे फलित आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान ‘गोविंदायन’ या विशेष संगीत नाट्य सादरीकरणाची रंगतदार मेजवानी रंगभूमी प्रेमींना अनुभवायला मिळाली. या सादरीकरणात संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ आणि संगीत मृच्छकटिक यांतील निवडक प्रवेश सादर करण्यात आले. निनाद जाधव, श्रद्धा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले. कलाकारांना गौरवण्यात आलं : यावेळी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक कलाकारांना गौरवण्यात आले. त्यामध्ये सर्वोत्तम लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक, संगीतकार, रंगभूषाकार, कलाकार अशा विविध श्रेणींतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विशेषत: ‘असेन मी नसेन मी’, ‘वरवरचे वधुवर’, ‘उर्मिलायन’ आणि ‘शिकायला गेलो एक’ या नाटकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. तसेच, राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा म्हणजेच ‘नाट्यपरिषद करंडक’ 2 व 3 ऑगस्ट रोजी 20 केंद्रांवर होणार असून अंतिम फेरी 18 ते 21 ऑगस्ट 2025 या दरम्यान होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. विजेत्या संघांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. शेवटी, श्रीमती वृषाली शेट्ये आणि 51 वर्षे रंगभूमीवर कार्यरत असलेल्या ‘अनुराग’ संस्थेलाही त्यांच्या योगदानाबद्दल विशेष सन्मानानं गौरवण्यात आलं.
