मुंबई / महान कार्य वृत्तसेव
गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ न्यूज मध्ये आहे. राज्य शासनाच्या अनेक उपक्रमांपैकी महिलांसाठी राबविण्यात आलेली ‘लाडकी बहीण’ योजना ही एक क्रांतिकारी योजना ठरली आहे. या योजनेनं महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि आत्मभान निर्माण केलं. आता हाच आशय केंद्रस्थानी ठेवून ‘लाडकी बहीण’ या नावानं एक मराठी चित्रपट साकारला जात आहे, ज्याचा मुहूर्त सोहळा नुकताच साताऱ्यात मोठ्या थाटामाटात पार पडला.
‘लाडकी बहीण’ चित्रपटाबद्दल : ओम साई सिनं फिल्म प्रस्तुत आणि शुभम फिल्म प्रॉडक्शनच्या सहयोगानं या चित्रपटाची निर्मिती शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे यांच्या संयुक्त विद्यमानं होणार आहे. दिग्दर्शनाची धुरा गणेश शिंदे यांनी सांभाळली असून, कथा आणि संवाद लेखनाचं काम शितल शिंदे यांनी केलं आहे. या विशेष सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार यांनी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप देत चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात केली. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, तसेच इतर मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
सामाजिक आणि कौटुंबिक चित्रपट : चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं की, ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट केवळ माहितीपट न राहता, एक भावनिक, सामाजिक आणि कौटुंबिक चित्रपट म्हणून सादर केला जाणार आहे. या माध्यमातून समाजप्रबोधनासोबतच मनोरंजनाचाही समतोल राखला जाणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव आणि जयश्री सोनवले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
‘लाडकी बहीण’ चित्रपटात सामाजिक संदेश : गजानन शिंदे यांचे छायाचित्रण कौशल्य, विनीत देशपांडे यांचे संगीतरचनेतले योगदान, तसेच अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांचं सुमधुर गायन, यामुळं चित्रपटाचं संगीतसुद्धा खास ठरणार आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी पंकज चव्हाण सांभाळत आहेत, तर प्रशांत कबाडे आणि शिवाजी सावंत हे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट एकाच वेळी प्रबोधन, सामाजिक संदेश आणि भावनिक कथा यांचे प्रभावी मिश्रण ठरणार आहे असं निर्मात्यांनी सांगितलंय.
