चंद्रपूर / महान कार्य वृत्तसेवा
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे गेल्या 7 दिवसांपासून अमरावतीत उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पाठिंबा दिला आहे.
वास्तविक, दिव्यांगांना 6 हजार मानधन, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा विविध मागण्या घेऊन माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी उपोषण छेडले आहे. या आंदोलनाला आता विरोधी पक्ष आणि इतर संघटनाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आता काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरच्या खासदार आहेत.
प्रतिभा धानोरकरांचं बच्चू कडूंना पत्र- प्रतिभा धानोरकर यांनी पत्र लिहू बच्चू कडू यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. माजी आमदार बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांग आणि समाजातील वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचं खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. ”आपण जनसामान्यांच्या हितासाठी नेहमीच संघर्ष करत आला आहात, आपल्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे, ही बाब अभिनंदनीय आहे,” असं खासदार धानोरकर यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.
बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या मागण्या जनसामान्यांच्या हिताच्या असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना आपला आणि आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे. ”जनप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडणे आणि ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे, हे आपले कर्तव्य आहे. आपण करत असलेले हे आंदोलन निश्चितच सकारात्मक परिणाम घडवेल, अशी मला आशा आहे,” असेही धानोरकरांनी पत्रात नमूद केलं आहे.
