24 तासात राज्यात कोरोनामुळे चौघे दगावल्यानंतर अजित पवारांचं विधान
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात भाष्य केलं आहे. करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये नेमकं काय झालं याची माहिती देतानाच अजित पवारांनी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलची माहितीही दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी करोनाचे 102 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील करोना रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे. राज्यामध्ये शुक्रवारी करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कोणत्या नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती सांगितली आहे.
महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
राज्यामध्ये शुक्रवारी सापडलेल्या 102 रुग्णांमध्ये 27 रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सापडले. त्याखालोखाल पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 26, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सांगली जिल्हा, सांगली महानगरपालिका, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी पाच जण रुग्ण सापडले. मालेगाव महानगरपालिका हद्दीत चार, पनवेल महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी तीन, नवी मुंबई महानगरपालिका, अमरावती जिल्हा, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी दोन, अकोला, नागपूर व उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. राज्यामध्ये शुक्रवारी चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. यातील तीन रुग्ण हृदयविकाराने त्रस्त होते. तर एका रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या 25 वर पोहचली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी, ”तुम्हाला माहितीये की आपण सगळ्यांनी अनेकदा 2020 ला जो करोना आला. त्या करोनाने जगाला वेढलं होतं. देशाला वेढलं होतं, राज्याला वेढलं होतं. पुणेकरांनाही वेढलं होतं. त्यावेळेस दर आठवड्याला बैठक घ्यायचो आणि सर्वांना जबाबदारीचं वाटप करुन संपूर्ण यंत्रणा कामाला लावायचो आणि त्यामधून आपण बाहेर पडलो. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वात जास्त रुग्ण केरळमध्ये बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातही आहेत पण आपल्या इथं पुण्यापुरतं, पिंपरी-चिंचवडपुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे,” असं सांगितलं.
पुढे बोलताना अजित पवारांनी, ”राज्याचा आढावा दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंर्त्यांच्या उपस्थितीत दिला जातो आणि आढावा घेतला जातो. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सतत यावर लक्ष ठेऊन आहेत. विविध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाई याबद्दलची बैठक घेतली होती. जिल्हा परिषदांनी काय केलं पाहिजे, सिव्हील सर्जनने काय केलं पाहिजे. डीएचओ असतील आपल्या दोन्ही महानगर पालिका असतील, महापालिकेचे आरोग्य विभाग असतील या सर्वांबद्दल आम्ही विभागीय आयुक्तांबरोबरच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चर्चेदरम्यान त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना घाबरुन जाण्याचं कारण नाही पण ज्यांची वयं जास्त आहेत, वयस्कर लोक आहेत त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे. खोकला किंवा शिंक आल्यास नॅपकिन वापरण्याची गरज आहे. ही अशी काही काळजी घेतली गेली पाहिजे, यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत,” अशीही माहिती दिली.
मागील सहा महिन्यात राज्यातील स्थिती काय?
जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 20 हजार 468 करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 1 हजार 914 जण बाधित आढळले. आतापर्यंत 1276 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 629 रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.
