नाशिक / महान कार्य वृत्तसेवा
नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी द्वारका चौक परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिका, वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना खरमरीत शब्दांत सुनावल्याचे दिसून आले.
द्वारका चौकात हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत तेथील गोल चौक (सर्कल) हटविण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी हे द्वारका चौक परिसरात दाखल झाले होते. या कामाची पाहणी करत असताना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.
भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापले
छगन भुजबळ यांनी मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली भिक्षेकरी ठाण मांडून असतात, सर्व्िहस रोडवर अतिक्रमण आहेत. याबाबत विचारणा केली असता मनपाच्या अधिकाऱ्यांनी हे आमचे काम नाही, असे उत्तर दिले. मनपा अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर छगन भुजबळ चांगलेच संतापले.
छगन भुजबळांचा इशारा
”मी मुंबई महापालिका सांभाळली आहे, कोणाचे काय काम हे मला चांगले माहीत आहे. अधिकारी काम करत नसतील तर मी स्वत: रस्त्यावर उतरतो,” असा थेट इशारा भुजबळ यांनी दिला. सध्याचे अधिकारी खूप बिझी झालेत. मानस हॉटेलमध्ये जायला वेळ आहे, पण येथे पाहणीसाठी येण्यासाठी वेळ नाही, असे म्हणत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावाले.
प्रशासन ॲक्शन मोडवर
छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासन लगेचच ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक पोलिसांनी द्वारका चौकातील अनधिकृत फेरीवाले, फळ विक्रेते आणि रिक्षा-टॅक्सी चालकांना तत्काळ हटवले. वाहतूक कोंडीचा मुख्य कारणीभूत घटक असलेले हे अनधिकृत थांबे दररोज वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत होते. छगन भुजबळ आक्रमक झाल्यानंतर या समस्यांवर कारवाई करण्यात आली.
क्रेडाईचे पदाधिकारी भुजबळांच्या भेटीला दरम्यान, छगन भुजबळ यांच्या भेटीला बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेचे पदाधिकारी भुजबळ फार्मवर दाखल दाखल झाले आहेत. भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने विविध संघटनांचे पदाधिकारी भुजबळांच्या सदिच्छा भेटीसाठी येत आहेत. नुकताच 300 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी काही बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. भुजबळ आणि क्रेडाई पदाधिकाऱ्यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
