बिपाशा बासूने अखेर प्रतिक्रिया दिली, म्हणाली…
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा अलीकडेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिच्या पर्सनॅलिटीमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत होते. आई झाल्यानंतर तिचं वजन देखील वाढलेलं आहे. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनाबाबत तिला ट्रोल केलं. आता बिपाशा बासूने या ट्रोल करणाऱ्यांना थेट प्रत्युत्तर दिलं असून स्पष्टपणे सांगितलं आहे की, अशा ट्रोलिंगने तिला काहीही फरक पडत नाही.
फॉर्मर मिस इंडिया आणि ब्युटी इन्फ्लुन्सर श्वेता विजय नायर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत बिपाशाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला. श्वेता नायर हिने महिलांना आई झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांविषयी बोलत एक व्हिडीओ शेअर केला. याच व्हिडीओवर बिपाशाने कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं.
बिपाशा बसुने श्वेताचे आभार मानत लिहिलं ”तुझ्या थेट आणि स्पष्ट शब्दांसाठी धन्यवाद. मला आशा आहे की लोक नेहमी इतके उथळ आणि खालच्या पातळीवरचे राहणार नाहीत. महिलांनी दररोज निभावलेल्या असंख्य भूमिका लक्षात घेऊन त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं. मी एक सुपर कॉन्फिडेंट स्त्री आहे, जिच्याकडे एक प्रेमळ जोडीदार आणि मजबूत कुटुंब आहे.”
पुढे बिपाशा म्हणाली ”मीम्स आणि ट्रोल्सनी कधीच मला परिभाषित केलं नाही किंवा मला मी जे आहे ते बनवलं नाही. मात्र ही सामाजिक मानसिकतेतील एक त्रासदायक बाब आहे. माझ्या जागी एखादी दुसरी स्त्री असती, तर ती या क्रूरतेने खूप त्रस्त आणि दु:खी झाली असती. त्यामुळे जर आपल्याकडे अधिक मजबूत आवाज असतील, आणि विशेषत: स्त्रियांनीच एकमेकींचं समर्थन केलं तर महिला आणखी उंच झेप घेतील. आपण अशा स्त्रिया आहोत, ज्या कोणाच्याही अडथळ्यामुळे थांबणार नाहीत.”
या पोस्टवर बिपाशा बसुच्या पतीने अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनेही कमेंट करून श्वेता नायरचे आभार मानले आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने देखील यावर सहमती दर्शवली आहे.
