मृतदेह ताब्यात देताना शरिराच्या प्रत्येक भागाचा डिएनए करा’, विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची मागणी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
विमान दुर्घटनेतील मृतदेह नातेवाईकांना देण्यापूर्वी त्यातील प्रत्येक भागाची डिएनए चाचणी करून सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत, याची खात्री करून घेण्याची मागणी आता नातेवाईंकडून केली जात आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आता कुटुंबियांचं पार्थिव अंत्यस्कारासाठी देण्यास सुरूवात होईल. अहमदाबादच्या सिव्हिल रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांकरिता एक स्वतंत्र डिएनए चाचणी कक्ष तयार करण्यात आला आहे. तिथं येणा-यांचे डिएनए नमुने घेत ते मृतदेहाच्या नमुन्यांशी जुळवून मृतदेहाची ओळख पटवली जात आहे.
दरम्यान, मृतदेहाचे अवशेष देताना शरिराच्या प्रत्येक भागाचा डिएनए करण्याची कुटुंबियांची मागणी अपघातात मृत्यूमुखी पडलेले महादेव पवार यांचे पुतणे महेश पवार यांनी केली आहे.
मृतदेह ताब्यात देताना शरिराच्या प्रत्येक भागाचा डिएनए करा- महेश पवार
हिंदू धर्मासह अन्य सर्व धर्मात अंत्यसंस्कार ही फार महत्त्वाची धार्मिक विधी आहे. त्यामुळे प्रशासनानं प्रत्येकाच्या भावनेचा आदर करायला हवा. या दुर्घटनेत अनेकांनी नातेवाईकांच्या रूपानं आपलं सर्वस्व गमावलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मृत व्यक्तींचे अवशेष परत घेताना ते आपल्याच व्यक्तीचे आहेत ना? अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविकच आहे. आणि त्यामुळेच ही मागणी महादेव पवार आणि आशा पवार या मृत पावलेल्या दांपत्याचे पुतणे महेश पवार यांनी केली आहे.
आतापर्यंत 227 प्रवाशांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट
दरम्यान, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कसोटी भवन येथे आज(14 जून) पुन्हा सकाळपासून डीएनए टेस्ट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आतापर्यंत 240 डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 227 प्रवाशांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत, तर इतर 13 मृतदेहांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत. डीएनए टेस्ट काम अजूनही कसोटी भवन येथे सुरू असून उर्वरित मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा डीएनए टेस्टचा आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. साधारणपणे 72 तासानंतर डीएनए टेस्ट मॅचचे रिपोर्ट समोर येतील. त्यामुळे नातेवाईकांना संयम ठेवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.
आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्या पवार दाम्पत्याचा मृत्यू आयुष्यात पहिलाच विमान प्रवास, धाकट्या मुलाला लंडनला जाऊन भेटण्याची आई-वडिलांची ओढ, मात्र पवार कुटुंबावर काळाचा घाला झाला. धाकट्या मुलाला लंडनला भेटण्यासाठी निघालेले मूळ सांगोल्याचे असलेले महादेव पवार आणि आशाताई पवार यांचा अहमदाबाद विमान अपघात मृत्यू झाला.
