झाशी (लखनौ) / महान कार्य वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील पूंछ पोलीस स्टेशन परिसरात झाशी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात आई आणि मुलीसह चालकाचा मृत्यू झाला. तर 5 जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार झाशीतील सिद्धार्थनगरच्या इत्री बाजार येथील 45 वर्षीय उवैदुर रहमान हे महाराष्ट्रात आपल्या कुटुंबासह राहतात. सिद्धार्थनगरमधील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते आले होते. वडील, पत्नी आणि 4 मुलांसह कारनं महाराष्ट्रात परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.
कार दुभाजकाला धडकली- झाशी- कानपूर महामार्गावरील पूंछ पोलीस स्टेशन परिसरातील खिल्ली येथे अचानक कार दुभाजकाला धडकली. अपघात इतका भीषण होता की उवैदुर रहमान यांची पत्नी आस्मा खान (40), त्यांची मुलगी उस्ना परवीन (15) आणि चालक आमिर (45) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात उवैदुर रहमानचे वडील शहाबुद्दीन (70), मुलगा अब्दुल्ला बहादूर (10), अनिदुर रहमान (8) आणि (6) वर्षांची मुलगी इस्म हे गंभीर जखमी झाले आहेत. जेसीबीच्या मदतीनं कारमधून बाहेर काढला मृतदेह- माहिती मिळताच पूंछ पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश पाल अपघातस्थळी पोहोचले. ते म्हणाले, जखमींना कारमधून काढताना अडचण आल्या होत्या. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीनं तात्काळ झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. तर महिला, तिची मुलगी आणि कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की चालकाचा मृतदेह जेसीबीच्या मदतीनं कारमधून बाहेर काढण्यात आलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
