अहमदाबाद,12 जून (पीएसआय)
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. उड्डाण केल्यानंतर 15 किमी अंतरावरच विमान रहिवासी विभागात कोसळलं. मेघानी परिसरात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटना किती भयानक होती हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये विमान खाली जमिनीवर कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा दिसत आहे. यावरुनच ही दुर्घटना किती मोठी आहे याची कल्पना येत आहे.
अपघाताचे कारण आणि नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही वेळातच ते मेघानीनगर परिसराजवळ कोसळले. मेघानीनगर हे विमानतळापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.
नेमकं काय झालं?
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान मेघानी नगरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झालं. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या उपस्थित आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विमानात 242 प्रवासी होते ज्यामध्ये 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे एअर इंडियाच बोईंग 787-8 ड्रीमलाइनवर विमान होतं.
ताज्या माहितीनुसार, बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. बीएसएफचं पथकही घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्यात सहभागी झालं आहे. हे विमान दिल्लीमधून अहमदाबादला पोहोचलं होतं आणि तेथून लंडनला रवाना होणार होतं. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील या विमानात होते. एअर ट्रॅफिक कंट्रोल नुसार, विमानाने रनवे क्रमांक 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यानंतर, विमानाने ताबडतोब एटीसीला मे डेचा संदेश दिला. या संदेशाचा अर्थ असा की विमानात आपत्कालीन परिस्थिती आहे. यानंतर, एटीसीने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.
