उद्यापासून पाणीपुरवठा होणार सुरू
इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर रोडवरील जलवाहिनीला लागलेली गळती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मंगळवारी काढण्यात आली. काही ठिकाणचा पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून ठप्प झाला होता. बुधवारपासून सदर परिसराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवर उपवन हॉटेल नजीक पावसाचे पाणी साचत होते. तसेच गटारी खराब झाल्या होत्या. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत होते. सदर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे तेथील गाळेधारकांना व नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत होता.
आमदार राहुल आवारे यांच्या प्रयत्नातून सदर ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट टाकण्याचे काम करण्यात आले होते. सांडपाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकत असताना. सदरचे काम करत असताना श्रद्धा कॉलनी मॉडर्न हायस्कूल परिसरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली होती. सदरच्या गळतीमुळे श्रद्धा कॉलनीसह काही परिसरातील पाणीपुरवठा गेल्या 12 ते 13 दिवसापासून ठप्प झाला होता. त्यामुळे सदर भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागले होते.
गळती काढण्याचे काम महापालिकेच्या वतीने सोमवारी हाती घेण्यात आले होते. मंगळवारी गळती काढण्याचे काम पूर्ण झाले असल्याने बुधवारपासून संबंधित परिसराला नियमितपणे पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
