पुलाची शिरोली : महान कार्य वृत्तसेवा
पुलाची शिरोली येथे सांगली फाटा नजीक अभिषेक लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने छापा टाकला. यामध्ये पिडीत महिला व अन्य दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. परशुराम कल्लाप्पा बडक्याळे (वय 65, रा.उचगाव, ता. करवीर) व संजय भरत मिठारी (वय 65, रा.साईबाबा कॉलनी, सर्किट हाऊस च्या मागे, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. याची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीसात झाली आहे.
गरीब व असाह्य महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांना पैशाचे आमिष दाखवून देह विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात ठेवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या धनश्री पाटील यांनी याबाबतची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे कोल्हापूर – सांगली राज्य मार्गाच्या उत्तरेस अभिषेक लॉज आहे. लॉजचे चालक-मालक परशुराम बडक्याळे व संजय मिठारी लॉज मध्ये एका महिलेला आर्थिक लाभाचे आमिष दाखवून तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने या मंगळवारी लॉजवरती छापा टाकला. यावेळी लॉज मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. संबंधित पीडित महिलेला एक हजार रुपये देऊन ते ग्राहकाकडून अडीच हजार रुपये घेत होते.
या कारवाईत एकूण 25 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 143(2), 3(5) व अनैतिक व्यापार प्रतिबंध 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 नुसार या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
