अपूर्ण बांधकाम झालेल्या उड्डाणपुलावर अडकली कार!
महाराजगंज (लखनौ) / महान कार्य वृत्तसेवा
गुगल मॅपचा वापर करून अनेकदा प्रवास करण्यात येतो. पण, गुगल मॅपनं चुकीची दिशा दाखविल्यानं कधी-कधी अपघातदेखील होतात. असा प्रकार उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात घडला आहे.
सोमवारी रात्री उशिरा महाराजगंज जिल्ह्यात लखनौहून निघालेली कार जिल्ह्यातील भैया फरेंडा भागात बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या टोकावर अडकली. वेळीच वाहनचालकानं काळजी घेतल्यानं मोठा अपघात टळला. ही घटना भारत-नेपाळला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-24 (गोरखपूर-सोनौली रोड) वर घडली. या ठिकाणी उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू असताना कार अडकली आहे.
उड्डाणपुल लांबून उड्डाणपुलासारखा दिसतो-स्थानिक लोकांच्या माहितीनुसार उड्डाणपुलाचा एक भाग पूर्णपणे बांधण्यात आला आहे. त्यावर पिचिंगदेखील करण्यात आलं आहे. त्यामुळे दुरून जाणाऱ्या लोकांना हा उड्डाणपुल सामान्य रस्त्यासारखा दिसतो. उड्डाणपुलाची दुसरी बाजू अद्याप अपूर्ण आहे. तिथे माती भरण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारात जाणाऱ्या वाहनचालकांना माहिती देणारा कोणताही फलक लावलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना उड्डाणपूल अपूर्ण असल्याचा अंदाज येऊ शकत नाही. अचानक समोर खड्डा दिसल्यानं चालकानं बेक लावला. परंतु तोपर्यंत गाडी पुढे सरकली होती. त्यानंतर गाडी थेट उड्डाणपुलाच्या टोकावर अडकली.
गुगल मॅपच्या चुकीनं रेल्वेवर अडकली होती गाडी- यापूर्वी झाशी जिल्ह्यातील तरुण गुगल मॅपमुळे दिशाभूल होऊन थेट रेल्वे ट्रॅकवर पोहोचले होते. गाडी बाजूला काढत असताना ती ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खडीमध्ये अडकली होती. अचानक रेल्वे ट्रॅकवरून वेगाने बुंदेलखंड एक्सप्रेस आल्यानंतर वाहनचालकानं गाडी सोडून पळ काढला होता. रेल्वे चालकानं अचानक इमर्जन्सी बेक लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेची धडक बसून गाडीचे तुकडे झाले.
कशामुळे होतो गुगल मॅपचा वापर? जगभरातील करोडो लोक इच्छितस्थळावर पोहोचण्याकरिता योग्य आणि जवळचा मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात. गुगलवरील मॅपमधून प्रवाशांना मार्ग दाखण्यासाठी योग्य दिशा आणि रस्ते दाखविलेले असतात. त्याचबरोबर मॅपमध्ये महत्त्वाची आणि चिन्हांकित केलेली स्थळेदेखील असतात. इंटरनेट नसले तरी गुगल मॅप डाऊनलोड करून वापरता येते. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील गुगल मॅपचा वापर वाढत आहे.
