इंदूर / महान कार्य वृत्तसेवा
मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी अलीकडेच हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेले होते. हनिमूनदरम्यान राजाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पत्नी सोनम रघुवंशीला अटक केल्यानंतर विविध खुलासे समोर येत आहेत. सोनमनेच आपला प्रियकर राज कुशवाह याला हाताशी धरून राजाची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. राजने आपल्या तीन मित्रांना सुपारी देऊन हे हत्याकांड घडवल्याचं देखील समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह तिचा प्रियकर राज आणि इतर तीन जणांना अटक केली आहे. या पाचही जणांची चौकशी केली असता हत्येचं खरं कारण समोर आलं आहे.
राज नव्हे तर या व्यक्तीसाठी सोनमने पतीचा जीव घेतला?
सोनमला प्रियकर राजशी लग्न करायचं होतं तर तिने थेट लग्न का केलं नाही? त्यासाठी आधी राजा रघुवंशीशी लग्न का केलं? आणि त्याची हत्या का केली? याचं खळबळजनक कारण आता पुढे आलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, सोनमचा प्रियकर राज हा सोनमचे वडील देवी सिंग यांच्या प्लायवूडच्या फॅक्टरीमध्ये काम करत होता. या काळात सोनम अनेकदा आपल्या वडिलांच्या फॅक्टरीत येऊन बसायची. याच काळात सोनमची राज कुशवाहशी ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेम फुललं.
वडिलांना वाचवायचं होतं म्हणून सोनम बनली खूनी
दोघंही मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण वडील प्रेम विवाहाला मान्यता देणार नाहीत, असं सोनमला वाटायचं. वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केलं, तर त्यांचा जीव जाईल, अशी भीती सोनमला होती. कारण सोनमच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होता. अशात सोनमने राजसोबत पळून जाऊन लग्न केलं, तर वडिलांना त्रास होईल आणि यात त्यांचा जीवही जाण्याचा धोका होता.
त्यामुळे सोनमने प्रियकर राजशी मिळून वेगळाच प्लॅन आखला. आधी राजाशी लग्न करायचं. मग काहीतरी बहाणा करून त्याची हत्या घडवून आणायची. राजाची हत्या झाल्यास सोनम विधवा बनेन. यानंतर सोनमचे वडील आपल्या विधवा मुलीचं फॅक्टरीत काम करणाऱ्या राजशी लग्न लावून द्यायला तयार होतील, असा प्लॅन सोनम आणि राजने आखला होता. त्यानुसार दोघांनी नियोजित कट रचून राजाची हत्याही केली. पण त्यांचं बिंग फुटलं. पोलिसांनी सोनमसह तिचा प्रियकर राजा आणि इतर तीन जणांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
