कॉल रिकॉर्डिंगमधून काय मिळाली माहिती?
इंदौर (भोपाळ) / महान कार्य वृत्तसेवा
शिलाँगमध्ये राजा रघुवंशीच्या हत्येतील संशयित आरोपी सोनमची पोलिसांनी संपूर्ण ‘कुंडली’ काढली आहे. सोनमला तिच्या साथीदारांसह तिच्या पतीची हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध पोलिसांना अनेक पुरावे सापडले आहेत. इंदौर पोलिसांनी सोनमसह इतर तीन आरोपींना 7 दिवसांची ट्रान्झिट रिमांड सुनावली आहे.
शिलाँग पोलिसांनी गोळा केले तांत्रिक पुरावे – राजा रघुवंशींच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी मध्य प्रदेशातील आहेत. या प्रकरणात सोनम आणि इतर आरोपींकडून माहिती मिळण्यापूर्वीच शिलाँग पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती. पुरावे सापडताच शिलाँग पोलिसांनी इंदूर पोलिसांनाही इनपुट पाठवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सोनमच्या संपूर्ण कॉल हिस्ट्रीची माहिती घेण्यात आली. पोलिसांना सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा यांच्या झालेल्या संवादाचे पुरावे सापडले.
मृतदेह सापडल्यानंतर प्रकरणाला लागलं वळण- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलाँगमध्ये लग्नानंतर रघुवंशी जोडपे बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस अपघात झाल्याच्या दृष्टिकोनातूनही तपास करत होते. परंतु 2 जून रोजी राजा रघुवंशी यांचा मृतदेह खोल खड्ड्यात सापडल्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण लागलं. राजा यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांची हत्या झाल्याची पुष्टी झाली. त्यामुळे पोलिसांनी सोनमच्या कॉलची इत्यंभूत माहिती गोळा करण्याला सुरुवात केली. शिलाँगमध्ये राहून सोनम रोज कुशवाहाशी बोलत होती. त्यामुळे शिलाँग पोलिसांना संशय येताच त्यांनी इंदूर पोलिसांना माहिती दिली. जेणेकरून राज कुशवाहाच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल.
राज कुशवाहावर होती पोलिसांची नजर-शिलाँग पोलिसांनी राज कुशवाहावर पाळत ठेवली. त्याच्या कॉल लोकेशनच्या आधारे इंदौरला पोहोचले. इंदूर पोलिसांनाही या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. दोन्ही पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रात्री उशिरा राज कुशवाहाला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच कुशवाहानं पोपटासारखं बोलण्याला सुरुवात केली. त्यानं रघुवंशींच्या हत्येत सहभागी असलेल्या सर्व साथीदारांची माहिती दिली. यानंतर इंदौर पोलिसांच्या मदतीनं शिलाँग पोलिसांनी एकामागून तीन आरोपींना आणि सोनमलाही शोधून काढले. सोनमच्या सूचनेवरून राजनं 3 कॉन्ट्रॅक्ट किलर शिलाँगला पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. असे असले तरी सोनम अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूरला कशी पोहोचली, याबाबत माहिती समोर आलेली नाही.
सोनम आणि कुशवाह यांचे 1000 हून अधिक मेसेज आणि चॅट्स- पोलीस तपासात राजा कुशवाह आणि सोनम रघुवंशी यांच्यात 1 हजाराहून अधिक मेसेज आणि चॅट्स असल्याचंही समोर आलं आहे. या हत्येप्रकरणी इंदूर पोलिसांचे एडीसीपी राजेश दंडौतिया म्हणाले, ”रघुवंशी हत्या प्रकरणात विशाल चौहान, राज कुशवाह आणि आकाश राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.” आरोपींना शिलाँगमध्ये नेण्यात येणार- इंदूर येथून अटक केलेल्या आरोपींना सोमवारी संध्याकाळी इंदूर जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शशांक सिंह यांच्यासमोर हजर करण्यात आलं. शिलाँग पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपीला 7 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर शिलाँग पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याचवेळी, बिना येथून अटक केलेल्या आरोपी आनंदलाही इंदूर येथे आणून आज (मंगळवार) न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यानंतर, शिलाँग पोलीस सर्व आरोपींना चौकशीसाठी सोबत घेऊन जाणार आहेत.
