पुणे / महान कार्य वृत्तसेवा
आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना प्रत्येक वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पुढे असणारे अजित दादा पक्षफुटीनंतर गेल्या दोन वर्षांपासून वेगळा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेगळा वर्धापन दिन साजरा होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना अजितदादांची आज आठवण येते का? असं विचारलं असता त्या म्हणाल्या की दादांची मला रोज आठवण येत असते. सगळ्या भावांची आठवण मला येते, मला सहा भाऊ असून, सगळ्यांशी रोज बोलणं होतं आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देत असते, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सशक्त लोकशाहीत स्वत:चं मत मांडण्यात गैर काय? – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यात 10 वाजून 10 मिनिटांनी पक्ष कार्यालय येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. आपण जे स्टेट्स ठेवलं आहे, त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझ्या आईने मला जो सल्ला दिला, तो मला काल विमानात बसल्यावर आठवला आणि तो मी ट्विट केला. सशक्त लोकशाहीत स्वत:चं मत मांडण्यात गैर काय आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुन्हा एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाहायला मिळणार का? – आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वेगवेगळे वर्धापन दिन साजरे केले जात आहेत, पुढच्या वर्षी पुन्हा एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाहायला मिळणार का? असं यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, तुमची जी अपेक्षा असेल ती मी माझ्या पक्षातील वरिष्ठांना कळवेन. तसेच गेल्या 26 वर्षांत पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी जे जे योगदान दिलं, त्या प्रत्येकाचं योगदान हे महत्त्वाचं आहे, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. मला घरच्यांशी बोलायलादेखील वेळ मिळाला नाही – गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहेत. आपल्याकडे साहेबांनी जबाबदारी दिली आहे, याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मी गेली 15 दिवस बाहेर होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशाच्या बाहेर होते. त्यामुळे मला घरच्यांशी बोलायलादेखील वेळ मिळाला नाही, असंही यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितलंय.
