पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
पुलाची शिरोली येथील माळवाडी भागात राहणाऱ्या प्रथमेश ढाले याने त्याचा मावस भाऊ शैलेश कांबळे याच्यावर एडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली आहे.
अधिक माहिती अशी की,शैलेश संजय कांबळे (वय २९) व प्रथमेश मोहन ढाले (वय-२३) हे दोघे मावसभाऊ पुलाची शिरोली येथील माळवाडी परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी या परिसरातील एका लग्नाच्या हळदी समारंभात डॉल्बी लावला असता तेथे शैलेश हा नाचत होता. त्यावेळी प्रथमेश याने आवाज कमी करण्यास सांगितले असता, दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली होती.
याचा राग मनात ठेवून प्रथमेश ढाले याने सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास झेंडा चौक येथे शैलेश कांबळे यास गाठून त्याच्यावर एडक्याने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
डोक्यात व हाताच्या मनगटावर वार करून गंभीर इजा केली आहे. शैलेशला रक्तबंबाळ अवस्थेत तात्काळ सीपीआर येथे नेण्यात आले. त्याच्या डोक्यावर व मनगटावर सुमारे १५ टाके पडले आहेत. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून जखमी शैलेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रथमेश ढाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
