Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

अमेरिकेत सरकार विरोधी आंदोलनात सहभागी झालेले अथवा या आंदोलनांना सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून पाठिंबा देणारे परदेशी विद्यार्थी यांच्या विरोधात ट्रम्प प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तसेच शेजारी देशांतून अमेरिकेत येऊन योग्य कागदपत्रांशिवाय अथवा व्हिसाची मुदत संपूनही मुक्काम करत असलेल्या परदेशी नागरिकांच्या हकालपट्टीची मोहीम अमेरिकेने हाती घेतली आहे. अमेरिकेच्या या दोन्ही मोहिमांबाबत ट्रम्प यांच्या विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीकडे दुर्लक्ष करत ट्रम्प प्रशानाने कठोर पवित्रा स्वीकारला आहे. ताजी घटना न्यू जर्सीतील नेवार्क विमानतळावरील आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेबाबत सविस्तर माहिती हाती आलेली नाही. पण व्हिडीओ बघून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

 नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याचे हात हातकडीने बांधले आहेत. या विद्यार्थ्याला जमिनीवर जबरदस्तीने झोपवण्यात आले. त्याची कसून अंगझडती घेण्यात आली. एकाचवेळी चार पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत आलेला तरुण विद्यार्थी पोलिसांच्या गराड्यात नेवार्क विमानतळावर होता. विद्यार्थ्याचे हात हाकड्यांमध्ये होते. पोलिसांच्या सूचनांचे तो तरुण विद्यार्थी रडत पालन करत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच भारताच्या अमेरिकेतील वाणिज्य दूतावासाने चौकशी करुन योग्य ती कारवाई करू असे जाहीर केले आहे.