Spread the love

महिलांची मोठी उपस्थिती ; पोलिसांचा बंदोबस्त

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी शहर आणि परिसरात वटपौर्णिमा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक महिलांनी सकाळपासूनच वडाच्या झाडाजवळ गर्दी केली होती. महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी वडाची पूजा केली.

शहरातील विविध मंदिर परिसर, सार्वजनिक उद्याने आणि रस्त्यांलगत असलेल्या वडाच्या झाडांभोवती महिलांचा मोठा जमाव दिसून आला. पूजा, फेरे, आरती आणि परस्परांना ओवाळून वटपौर्णिमेचे मंगलाशीर्वाद देत महिलांनी परंपरेचे पालन केले. सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शहरातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी दिवसभर तैनात होते. वाहतूक व्यवस्थाही सुरळीत राहावी यासाठी विशेष पथके कार्यरत होती.

दरम्यान, जवाहर नगर परिसरातील भागात नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते वडाच्या झाडाची पूजा करून संपूर्ण प्रभागात पाचशे ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.