संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर जमाव पांगला
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी इथं खाजगी इमारतीत चुकीच्या पद्धतीनं सुरु असलेलं प्रार्थनास्थळ बंद करण्यासाठी पोलिसांसह पोहचलेल्या ८ हिंदुत्ववाद्यांवरच गुन्हा दाखल झाला. त्यामुळं संतप्त झालेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले. यावेळी हिंदुतत्ववाद्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलीस ठाणे आवारात प्रार्थना करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं मात्र गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाण्यातून हलणार नाही, असं म्हणत हिंदुत्ववाद्यांनी ठिय्या मारला. अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते परतले.
इचलकरंजीतील राजर्षी शाहु पुतळ्याजवळील सोन्यामारुती मंदिराच्या मागील परिसरात खाजगी इमारतीत प्रार्थनास्थळ सुरु आहे. त्याचा परिसरातील नागरीकांना त्रास होत असल्यानं नागरीकांनी हिंदुत्ववाद्यांकडं तक्रार केली होती. त्यामुळं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन रविवारी हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचले असता धर्मांतरणाचा प्रकार निदर्शनास आला होता. यावेळी लोकांशी शाब्दीक वाद घातल्या प्रकरणी प्रार्थनास्थळाशी संबंधितांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी पोलीस ठाणे आवारातच सामुहिक प्रार्थना केली होती. त्यानंतर पोलिसांनी शिवजी व्यास यांच्यासह ८ जणांवर रविवारी झालेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल केला आहे. यामुळं संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकत्र जमुन याचा जाब पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांना विचारला. यावेळी साळवे यांनी दिलेल्या उत्तराने हिंदुत्ववाद्याचे समाधान न झाल्याने पोलीस ठाणे आवारातच वादग्रस्त प्रार्थनास्थळाशी संबंधित व्यक्तिवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका घेतली.
दरम्यानच्या काळात पोलीस ठाणे आवारात गजानन महाजन (गुरुजी) यांचे आगमन झाले. झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत दुपारी २ वाजेपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आक्रम भूमिका घेऊ, असा इशारा दिला. बराचवेळ झाला तरी पोलिसांकडून कोणतेही उत्तर न आल्याने अखेर ताटकळत उभारलेल्या हिंदुत्ववाद्यानी शिवतिर्थ परिसरात जाऊन बसण्याची भूमिका घेतली. या भूमिकेनंतरच उपअधिक्षक साळवे यांनी हिंदुत्ववाकार्यत्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेत त्वरीत गुन्हे दाखल करण्याचे मान्य केले.
काही काळानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्ठात आल्यानंतर पोलीस उपअधिक्षक साळवे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी महाजन गुरुजी यांनी केवळ गुन्हे दाखल करुन चालणार नाही, तर बेकादेशीर कृत्य करणार्यांना कडक शासन करा आणि निरापराध कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे त्वरीत पाठीमागे घेण्याची कार्यवाही सुरु करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस ठाणे आवारातील कार्यकर्ते परतले. सुमारे २ तास चाललेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाणे आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाणे आवारात बंदोबस्त लावण्यात आला होता.

