स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तात्काळ हकालपट्टीची मागणी
पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा
पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खाजगी ऑपरेटरकडून बेकायदेशीररीत्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या ऑपरेटरची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून, आता या प्रकरणी संबंधित अधिकारी कोणती पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जमिनी खरेदी-विक्रीचे दस्त, तारणगहाण, हक्कसोड आदी व्यवहार नोंदवले जातात. शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या या कार्यालयातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. मात्र, या कार्यालयात शासन नियमानुसार नेमलेले कर्मचारी सोडून एक खाजगी ऑपरेटरच कार्यालयाचे काम बिनधास्तपणे पाहत असून, तो स्वतःच साहेब असल्याच्या थाटात खुर्ची टाकून बसतो, हे धक्कादायक आहे. विशेष म्हणजे, या बेकायदेशीर प्रकारास येथील अधिकाऱ्यांचा मूक पाठिंबा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सदर ऑपरेटरकडून दस्तावेजांसाठी आलेल्या पक्षकारांकडून “तुमचे सर्व काम मी करून देतो, फक्त कागद आणा,” अशा प्रकारची आश्वासने देत नागरिकांची आर्थिक लुट सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे.
दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एप्रिल महिन्यातच जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर काही काळासाठी या ऑपरेटरची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच तो पुन्हा येथील अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने कार्यालयात कार्यरत दिसून आला, हे विशेष उल्लेखनीय आहे. यावरून संबंधित अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट होत असल्याचे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रकारामुळे आक्रमक झाली असून, पुन्हा एकदा निवेदन देऊन या बेकायदेशीर ऑपरेटरची तात्काळ हकालपट्टी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, प्रांताधिकारी पन्हाळा यांच्या कार्यालयासमोर तीव्र ‘बोंब मारो आंदोलन’ छेडण्याचा इशाराही स्वाभिमानीच्यावतीने देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील, अजित साळोखे, बाळासो पाटील, सचिन भोसले, किरण पाटील, संजय भोसले, धनंजय सवंदत्ती आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
