माहिती कळवणाऱ्यास दंडाच्या रकमेतील 20 टक्के बक्षीस
आयुक्त पल्लवी पाटील यांचा अनोखा उपक्रम
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. खास करून शहरातील स्वच्छतेवर अधिक भर दिलेला आहे. तरी काही लोक जाणीवपूर्वक रस्त्यावरती कचरा टाकतात, याची गंभीर दखल आयुक्त पल्लवी पाटील यांनी घेतली आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याचा लोकेशनसह फोटो महापालिकेला पाठवल्यास त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करून त्यातील 20 टक्के रक्कम माहिती देणाऱ्यास देण्यात येणार आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.
दरम्यान यासाठी महापालिकेने 7030603939 हा व्हाट्सअप क्रमांक दिलेला आहे. सुज्ञ नागरिकांनी या नंबर वरती संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
महानगरपालिका वर्धापन दिन आणि स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत संपूर्ण शहरात महास्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारच्या मोहिमे दरम्यान शहरातील काही नागरिक आपल्या घराजवळ येणाऱ्या घंटागाडी मध्ये कचरा न टाकता रस्त्यावर, गटारीत अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे निदर्शनास आले. महानगरपालिकेकडून अशा बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. तरी सुद्धा काही नागरिक अजूनही कचरा घंटागाडीमध्ये न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र टाकत आहेत ही गंभीर बाब निदर्शनास आल्याने आयुक्त पल्लवी पाटील यांनी याबाबत वेगळ्या स्वरूपाची कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिलेल्या आहेत.
या अनुषंगाने शहरातील कोणत्याही परिसरात एखादा नागरिक आपल्या घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा घंटागाडीमध्ये न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र ठिकाणी टाकत असल्याचे आढळून आल्यास सदर व्यक्तीचा जी.पी.एस. प्रणाली द्वारे फोटो घ्यावा आणि महानगरपालिकेच्या (7030603939) या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवावा.
महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सदर व्यक्तीस ५०० रुपये दंडाची आकारण्यात येऊन या दंडाच्या रकमेपैकी २० टक्के रक्कम बक्षीस स्वरूपात फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीस दिली जाईल. त्याचबरोबर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा फोटो महानगर पालिकेच्या अधिकृत सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येईल. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा इतरत्र न टाकता आपल्या परिसरात येणाऱ्या घंटा गाडीमध्ये टाकावा जेणेकरून दंडात्मक कारवाई सारखे कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
